आज अखेर तालुक्यात बरसला 190 मिमी पाऊस
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील सर्व सर्कल मध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली असून सरासरी 18.33 मिमी तर एकूण 165 मिमी एवढा पाऊस एक दिवसात झाला आहे.
पंढरपूर तालुक्यात बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सर्व आठही सर्कल मध्ये पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. सर्वाधिक 40 मिमी पाऊस तुंगत मंडलमध्ये तर सर्वात कमी पंढरपूर मंडलात 7 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
पंढरपूर तालुक्यात यंदा पावसाने जूनपासून सातत्याने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. यंदा जून मधील पावसाची वार्षिक सरासरी पावसाने पार केली असून जुलै मधील सरासरी सुद्धा आजवर कायम ठेवलेली आहे. दरवर्षी जून – जुलै मध्ये ओढ देणाऱ्या पावसाने यंदा सुरुवातीपासूनच दमदार तळ ठोकला असून तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे.
बुधवारी तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस खालील प्रमाणे आहे.
करकंब 9 मिमी
पट कुरोली 8 मिमी
भंडीशेगाव 17 मिमी
भाळवणी 19 मिमी
कासेगाव 21 मिमी
पंढरपूर 7 मिमी
तुंगत 40 मिमी
चळे 27 मिमी
पुळुज 17 मिमी
एकूण पाऊस 165 मिमी झाला आहे. बुधवारी संपूर्ण तालुक्यात सरासरी पाऊस 18.33 मि. मी. झाला असून आज अखेर तालुक्यात सरासरी पाऊस 190.92 मिलिमीटर एवढा झाला आहे.
यंदा उजनी धरणातही समाधानकारक पाऊस असून भीमा खोऱ्यातील धरणे गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्के अधिक उपयुक्त पाणी पातळीत आहेत. त्यामुळे यंदाही उजनी धरण 100 टक्के भरणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढील हंगामातील पिकांचे नियोजन नेटाने सुरू केले आहे.