सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकाऱ्यांना मिळाला मान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा उद्या ( दि.8 रोजी ) बॉयलर अग्नी प्रदीपन होत आहे. पांडुरंग परिवाराचे दैवत सुधाकरपंत परिचारक यांच्या सोबत काम केलेल्या जेष्ठ 12 सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन होणार आहे.
श्रीपूर ( ता .माळशिरस ) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 2020 – 21 सालच्या गाळप हंगामासाठी 8 ऑक्टोबर रोजी बॉयलर प्रदीपन सकाळी 10 वाजता होत आहे. दरवेळी कोणी तरी बड्या असामीच्या हस्ते हा कार्यक्रम होत असतो. मात्र यंदा गाळप हंगामाच्या तोंडावर परिवाराचे प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे यंदा एकूणच गाळप हंगामावर दुःखाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभाच्या निमित्ताने सुधाकरपंत परिचारक यांच्या बरोबर काम केलेल्या जेष्ठ 12 शेतकरी, सभासदांना प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याच हस्ते बॉयलर प्रदीपन केले जाणार आहे.
यामध्ये लक्ष्मण सोपान डुबल ( अजनसोंड ), ज्ञानोबा राजाराम शिंदे ( रांझनी ), वसंत बाबुराव चव्हाण ( बाभूळगाव ), शिवाजी दत्तात्रय देशमुख ( कासेगाव ), जोतिराम रामचंद्र चव्हाण ( बाभूळगाव ), दादा नारायण यलमार ( सुपली ), धोंडीराम घनश्याम पाटील ( आव्हे ), अनंत दिगंबर राजोपाध्ये ( रांजनी ), संदीपान भीमराव वाडेकर ( शिरगाव ), शामराव सखाराम लोखंडे ( भंडीशेगाव ), सीताराम ज्ञानोबा बागल ( गादेगाव ), आबासो जयवंत गायकवाड ( चिंचोली भोसे ) यांचे हस्ते आयोजित करण्यात आले आहे.
कारखान्याचे संचालक परमेश्वर बजरंग गणगे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता सत्यनारायणाची महापूजा ही आयोजित केली आहे. पांडुरंग परिवार आणि तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दैवत असलेल्या सुधाकरपंत परिचारक यांच्याशिवाय हा पहिलाच बॉयलर प्रदीपन कार्यक्रम होत असला तरीही त्यांच्यासोबत काम केलेल्या जेष्ठ शेतकरी, सभासद, सहकाऱ्यांना मान देऊन सुधाकरपंत यांची वेगळ्या पद्धतीची ही कार्यक्रमास उपस्थितीच असल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन वसंत देशमुख, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी केले आहे.