शेतकऱ्यांची फसवणूक : शतावरीच्या शेतीवर नांगर

खेड भाळवणी येथील प्रकार


पंढरपूर : ईगल आय मीडिया

शतावरी ही आयुर्वेदिक औषधासाठी वापरली जाते. या शतावरीतून एकरी ९ लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे सांगत खेड भाळवणी ( ता. पंढरपूर) येथे काही शेतकऱ्यांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक सहन करून शतावरीच्या शेतात नांगर फिरवला आहे.

या शेतकऱ्यांना औरंगाबाद येथील एका कंपनीने एकरी पाच हजार याप्रमाणे लागवड करण्यासाठी रोपे दिली, त्यासाठी ५५ हजार रूपये जमा करून घेतले. मात्र संबंधित कंपनीच्या संचालकाने त्यानंतर शेतकऱ्यांची संपर्क करणे टाळत फोन स्विकारणेही बंद केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर शतावरी काढून टाकण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये त्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे समोर येत आहे.


खेड भाळवणी येथील अनंता घालमे व इतर तीन ते चार शेतकऱ्यांनी जुलै 2019 मध्ये शतावरीची लागवड केली. यासाठी औरंगाबाद येथील एका कंपनीने त्यांना ५५ हजार रुपये भरून घेत ५००० रोपांची विक्री केली. या शतावरीतून लाखोचे उत्पन्न मिळेल अशी आशा दाखवत या रोपांची विक्री एका कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली.

यादरम्यान, शेतकरी व संबंधित कंपनी यांनी नोटरी करून एक करार देखील केला असल्याचे समोर येत आहे. यामध्ये कंपनीने काही अटी घातल्या आहेत, यामुळे शेतकरी गांगरून गेले आहेत.
दोन शेतकऱ्यांनी शतावरीच्या शेतीवर नांगर फिरवला असून त्याच्याऐवजी आम्ही दुसरे पीक घेणार असल्याचे सांगितले. केवळ रोप विक्री पुरते त्या औरंगाबादच्या कंपनीचे अधिकारी प्लॉटच्या ठिकाणी येत होते. मात्र नंतरच्या काळात त्यांनी फोन घेणे ही बंद केले, यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाले आहे. शतावरीला दर मिळणार की नाही, कंपनी माल नेणार का नाही हे सर्व अनिश्चित असल्याने दोन शेतकऱ्यांनी शतावरीच्या शेतीवर नांगर फिरवून इतर पीक घेणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!