उद्या श्री विठ्ठलच्या चेअरमनपदाची निवड


 व्हाईस चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता 


टीम : ईगल आय

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी उद्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी चेअरमनपदी अभिजीत पाटील यांची निवड निश्चित असली तरी व्हाईस चेअरमनपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित बातमी चा व्हीडिओ पहा


 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक पाच जुलै रोजी झाली आणि सहा जुलै रोजी मतमोजणी झाली. यावेळी श्री विठ्ठल शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून  सत्ता जिंकल्याचे स्पष्ट झाले. तिरंगी लढतीत विठ्ठल शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने भरघोस मतांनी विजय मिळवला.  नूतन संचालक मंडळामध्ये बहुतांश चेहरे तरुण आणि नवखे आहेत. चेअरमन पदासाठी उद्या निवड होणार असून त्यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. 

यावेळी पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांची चेअरमन पदी निवड होणार आहे. तर उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळते याबाबत चर्चा सुरू आहे. संचालक मंडळात काही जेष्ठ मंडळीही असून त्यांच्यापैकी कोणास संधी मिळते की चेअरमनच्या जोडीला तरुण चेहरा घेतला जातो याकडेही संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. आहे.

 मागील वर्षी विठ्ठल कारखाना बंद राहिलेला आहे.  त्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ नेटाने कामाला लागल्याचे दिसून येते.  निवडणूक निकाल झाल्याच्या दिवसापासून अभिजीत पाटील व सर्व संचालक हरतर्हेनें कामाला लागले आहे असे दिसते. मागील दीड वर्षे ब्रेकवर असलेल्या सर्व कामगारांना कामावर बोलवण्यात आले असून त्यांना थकीत पगारीपोटी काही  रक्कम देण्यात आलेली आहे. तसेच तसेच ज्या सभासद संचालक व पदाधिकाऱ्यांकडे विठ्ठल कारखान्याची येणे थकबाकी आहे, ती वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.

उसाच्या नोंदी घेण्यासाठी शेती विभागाचे कर्मचारी गावोगावी फिरत आहेत आणि आठ दिवसात सुमारे 7000 एकर ऊसाचे नोंदी आलेली आहे. थकीत उसबिल दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही, अशी घोषणा अभिजीत पाटील यांनी प्रचारादरम्यान केली होती. त्या घोषणेच्या पूर्ततेसाठी  पाटील आर्थिक कामाला लागले आहेत. तसेच अनेक महिन्यापासून बंद असलेला कारखान्यावरील पेट्रोल पंप ही सुरू करण्यात आलेला आहे. ऊस वाहतूक व तोडणी ठेकेदारांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकूणच मागील दोन वर्षे मरगळ आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर निवडणूक निकालानंतर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.  

Leave a Reply

error: Content is protected !!