भारत भालकेंचा काळ हाच विठ्ठल चा सुवर्णकाळ

विस्तारिकरण, सह प्रकल्प, खुलं सभासदत्व, सर्वोच्च गाळप, साखर उतारा आणि उसाला भाव ही दिला

टीम : ईगल आय मीडिया

श्री विठ्ठल सहकारीचे दिवंगत चेअरमन भारत भालके यांच्या काळातच कारखान्याची खरी प्रगती झाली असून 18 वर्षात नेतृत्व करीत असताना भारत भालके यांनी सामान्य शेतकऱ्यांना विठ्ठलचा सभासद करून सन्मान दिला, कारखान्याचे विस्तारीकरण केले, सह प्रकल्प उभा करून 150 एकर जमीन खरेदी करून संस्थेची मालमत्ता वाढवली. त्याच बरोबर भालके चेअरमन असताना दुष्काळी परिस्थिती वगळता सर्वोच्च ऊस गाळप, सर्वोच्च साखर उत्पादन होत होते. त्यांच्याच काळात सभासदांना सर्वोच्च 2601 रुपयांचा दर ही दिला. उत्कृष्ट आर्थिक नियोजनासह तांत्रिक कार्यक्षमता सिद्ध केल्याबद्दल विठ्ठल ला राज्य आणि देश पातळीवरील पुरस्कार ही मिळाले. खऱ्या अर्थाने भारत नानांचा काळ हाच विठ्ठल साठी सुवर्ण काळ होता. तो पुन्हा आणण्याचे आव्हान भगीरथ भालके यांच्यासमोर आहे.

संबंधित बातमीचा व्हीडिओ पहा

पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घातलेला, तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा, पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा अशी अनेक बिरुदं ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी वापरली जातात तो विठ्ठल सहकारी साखर कारखाना मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जबाजारी झालेला, बंद पडलेला, कधीहो सुरु होऊ शकणार नाही अशी भाकिते वर्तवली जाणारा आणि राजकारणासाठी लुटला गेलेला असा कारखाना म्हणून ज्या कारखान्याची बदनामी केली जाते, त्या कारखान्यावर सत्ता मिळावी म्हणून एवढा संघर्ष करण्याचे कारण काय ? बुडणाऱ्या नावेत उड्या हाणायची शर्यत का लागली आहे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे. वास्तविक विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात जरूर आहे, परंतु जेवढी त्याची बदनामी केली जाते तेवढी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. आणि हे त्या मंडळींना माहिती आहे, जे सत्ता मिळवण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.


कारखान्याचे संस्थापक औदुंबर अण्णा पाटील यांच्या काळात विठ्ठल सहकारीच लौकिक राज्यभर होता, विठ्ठलच सुवर्णकाळ होता असे सांगितले जाते. आणि त्यात बऱ्याच अंशी तथ्यही आहे. म्हणून तब्बल १९ वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालवणारे, ३ निवडणुका जिंकून सभासदांचा विश्वास सार्थ करणारे दिवंगत चेअरमन भारत भालके यांच्या काळात विठ्ठल अधोगती झाली का प्रगती ? याचा आढावा आम्ही या स्टोरी मधून घेतो आहोत.

सन २००२ साली तत्कालीन चेअरमन वसंतदादा काळे यांचे आकस्मिक निधन झाले आणि विठ्ठलची सूत्रे भारतनाना भालके यांच्याकडे आली. तो काळ दुष्काळी होता. २००१ ते २००४ या ४ वर्षाच्या काळात दुष्काळामुळे ऊस उत्पादन कमी झाले होते. शेतकरी कमी पाण्याच्या अन्य पिकांकडे वळला होता. अशा शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, दुष्काळामुळे आर्थिक संकटात असल्याने मदतीचा हात देण्यासाठी भारत नाना याची शेती, पाणी तुमचं बाकी सगळं कारखान्याचं हा विठ्ठल पॅटर्न राबवला, शेतकऱ्यांना ऊस बेणे, खाते, ठिबक सिंचनसाठी अनुदान दिले त्यामुळे पुढील दोन, चार वर्षात ऊस लागवड वाढली.

विठ्ठल सहकारी चा सभासद असणे गावात, पै पाव्हण्यात प्रतिष्ठेचे मानले जात होते. मात्र हि प्रतिष्ठा गावातील ठराविक लोकांनाच मिळत होती. मोठे बागायतदार, सांगे सोयरे, गाव कारभाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना सभासदत्व दिले जायचे, गावातील पुढाऱ्यांची चिट्ठी किंवा वशिला असल्याशिवाय कारखाण्याकडे उसाची नोंद सुद्धा घेतली जात नव्हती.

या परंपरेला भारत नानांनी फाटा दिला आणि विठ्ठलचे सभासदत्व खुले केले, ज्याला हवे त्याला सभासद करून घेतले, गावातील पुढाऱ्यांची कामे करीत असताना थेट सभासदांशी संपर्क ठेवला, त्यांना मान, सन्मान दिला. त्यामुळे तालुक्यातील ५ ते ७ हजार कुटुंबापुरत्या मर्यादित असलेल्या विठ्ठलच्या सभासदांची संख्या २८ हजारापर्यंत वाढवली. राजकीय भूमिकेतून कधी कुणाचा ऊस अडवला नाही, कुणाचे साखर कार्ड रद्द लेले नाही, कुणाचे सभासदत्व रद्द केले नाही. उलट सर्व शेतकरी, सभासद यांची काळजी घेतानाच त्यांचा अपघाती मृत्यूबाबत विमा उतरवून सभासदांच्या कुटुंबाला आधार देण्याची भूमिका घेतली. म्हणूनच विठ्ठलच्या सभासदांना संचालक मंडळ, भारत नाना यांच्याविषयी आदर वाटत होता. सभासद आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करीत असतानाच नानांनि विट्ठलचा विस्तार करण्याचे, आर्थिक दृष्ट्या विठ्ठल सक्षम करण्याचे धोरण राबवले.

वाढत्या उसाचे पूर्ण गाळप व्हावे, अण्णांच्या काळातील जुन्या मशिनरीमुळे होणारे नुकसान कमी करावे, यासाठी विठ्ठलचे विस्तारीकरण ७ हजार ५०० टनापर्यंत केले, दोन टप्प्यात २९. मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १० मेगावॅटचा प्रकल्प कर्जमुक्त केला आहे. ३० हजार लिटर दरदिवशी निर्मिती क्षमतेचा आसवानी प्रकल्प नानांनी उभा केला आहे तो दोन हंगामात कर्जमुक्तही केला. कारखान्याच्या भविष्यातील योजनांसाठी जमीन आवश्यक असेल, जमिनीचे दर वाढत आहेत हे पाहून नानांनी १०० एकरहून अधिक जमीन खरेदी केली. आज विठ्ठलाच्या जमिनीचे शासकीय मुल्ल्यांकन ३१५ कोटी रूपये आहे. आणि विठ्ठलकडे बिगरशेती आणि शेत वहिवाट अशी एकूण ३४५ एकर जमीन आहे. एवढी जमीन जिल्हयातील दसऱ्या कोणत्याही कारखान्याकडे नाही.
शेतकऱ्यांनी घामाने, कष्टाने पिकवलेल्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणून भारत नानांनी कधीही हात आखडता घेतला नाही. २००१४-१५ पूर्वी देशात ऊस दर ठरवण्यासाठी एस एम पी धोरण होते. सर्वच कारखान्यांना एसएमपी नुसार दर द्यावा लागत होता. हा दर देताना अन्य कारखाने नफा मिळाला तरी शेतकऱ्यांना एसएमपी पेक्षा जास्तीचा दर देत नव्हते.

मात्र भारत नानांच्या नेतृत्वाखाली २००९ ते २००१४ या ६ वर्षांच्या काळात विक्रमी आणि साखर उत्पादन होत असताना एस एम पी पेक्षा 567 कोटी 85 लाख रुपये एवढी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे.दरवर्षी smp पेक्षा वाढीव दिलेली रक्कम कारखान्याचा नफा आहे असे समजून इन्कम टॅक्स विभागाने विठ्ठल कारखान्यास 232 कोटी 66 लाख रुपये इन्कम टॅक्स भरा म्हणून नोटीस काढली. नानांच्या कार्यकाळातच 5 हजार टन गाळप क्षमता असूनही विठ्ठल सहकारी दरवर्षी 12, 13 लाख टन ऊसाचे गाळप करीत होता आणि १२ ते आणि 14 लाख टन साखर उत्पादन सलग ५ ते ६ वर्षे घेतले आहे. याच काळात २ हजार ते 2600 रुपयांपर्यंत सर्वोच्च ऊस दर ही भारत नानांनी दिला. नानांच्या काळातच विठ्ठल च्या सभासदांना अच्छे दिन आले होते. म्हणूनच नानांचा कार्य काळ हाच सुवर्णकाळ होता.

नानांच्या काळात 11 टक्के हुन अधिक रिकव्हरी मिळत होती, मात्र जुन्या मशिनरी मुळे लॉसेस वाढत गेले, कारखान्याचे सभासदत्व खुले केले, या वाढीव सभासदांचा ऊस गाळप करणे कर्तव्य होते, म्हणून कारखान्याचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला, 2014-15 साली घेतला. तिथेच गणित थोडेसे चुकले. त्यानंतर १५-१६, १६-१७ असा सलग दुष्काळ पडला, उसाअभावी गाळप कमी झाले, मात्र दुसरीकडे विस्तारीकरण साठी घेतलेल्या कर्जाचा आणि व्याजाचा भार वाढत गेला. त्याचवेळी राज्यात विरोधी पक्षाचे सरकार होते त्यामुळे दोन, तीन हंगामात कारखान्यास असणारे पूर्व हंगामी तयारी साठी पैसे वेळेवर मिळाले नाहीत.

कारखाना आर्थिक अडचणीत यावा म्हणून तालुक्यातीलच हितचिंतकांनी आपले लागेबांधे वापरून पैसे वेळेवर मिळणार नाहीत यासाठी प्रयत्न केले आणि कारखाना अडचणीत आला. याच दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने अडचणीत आले, अनेक कारखाने बंद पडले, मात्र नानांविषयी मनात द्वेष भावना असलेलय लोकानी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवून, एक आदर्श संस्था आणि कर्तव्य तत्पर नेतृत्व असलेल्या भारत नानांची बदनामी केली, आजही करीत आहेत.

कारखाना जर डबघाईला आला आहे, कर्जाच्या विळख्यात अडकला आहे, फिटणार नाही एवढे कर्ज झाले आहे तर मग अशा बुडत्या नावेत बसण्याची विरोधक धडपड का करीत आहेत ? कारण त्यांना चांगले माहिती आहे, कि विस्तारीकरण केल्यामुळे कारखाना नवीन आहे, मशिनरी अत्याधुनिक आहे, गाळप क्षमता 7500 टन आहे, 45 हजार लिटर क्षमतेने चालणारा आसवानी प्रकल्प कर्जमुक्त चालतो आहे, 29.8 मेगावॅट क्षमतेचा सह वीजनिर्मिती प्रकल्प आहे. आणि ३४० एकर जमीन एवढे मोठे भांडवल जमेस आहे. त्यामुळे दोन हंगाम जरी चांगले चालले तरी कारखान्यावर असलेलं कर्ज फ़िटायला वेळ लागणार नाही.

आणि हे ओळखूनच एक सक्षम, अत्याधुनिक संस्था ताब्यात घेण्यासाठी विरोधकांची धडपड सुरू आहे. मात्र त्याचवेळी नानांनी यांच्या घराणेशाही ला आव्हान दिल्याचा ती मोडीत काढून सर्व सामान्य सभासदांना सन्मान मिळवून दिल्याचा रागहि यांच्या मनात आहे. नानांविषयी मनात असलेला द्वेष एवढा प्रखर आहे की यांना नानांचा फोटो सुद्धा चालत नाही. आणि म्हणूनच एकाच वेळी ते विठ्ठल कर्जबाजारी आहे, पुन्हा उभा राहणार नाही असा अपप्रचार करतात, दुसऱ्या बाजूला तो बळकावण्यासाठी आटापिटा करीत आहेत.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना एक मजबूत, सक्षम संस्था असून भारत नाना यांच्या काळातच विठ्ठलचा परिपूर्ण विस्तार, विकास झाला आहे. सभासदांना सन्मान आणि न्याय मिळाला आहे हे विरोधकही मनातल्या मनात तरी मान्य करीतच असतील. त्यामुळेच भारत नानांनी मजबूत केलेल्या किल्ल्यावर हल्ला चढवून तो जिंकू पाहत आहेत, सभासद यामध्ये कुणाला बळ देतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

error: Content is protected !!