मका खरेदी केंद्रे सुरु करा : आ. रणजितसिंह मोहिते -पाटील
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्य शासनाने मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली असली तरी सोलापूर जिल्ह्यासाठी केवळ ८ हजार क्विंटल मका खरेदीस मान्यता आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मका कमी भावाने विकावी लागत आहे. शेतकऱ्यांची हि गैरसोय दूर करण्यासाठी आ. रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची मका शासनाने खरेदी करावी अशी मागणी आम. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. एकट्या माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची ३० हजार क्विंटल मका विक्रीची ऑनलाईन नोंदणी असताना जिल्ह्यासाठी ८ हजार क्विंटल खरेदीस मान्यता हि मोठी विसंगती आहे. जिल्ह्यातील मका हमीभाव केंद्रे बंद झालेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेत १३५० ते १४०० रुपये दर आहेत. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत अशीही मागणी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मकेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. यावर्षी जिल्ह्यात ४० हजार क्विंटलपेक्षा जास्त मका उत्पादन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात मका हमीभाव केंद्रे सुरु झाली असली तरी सुरुवातीला बारदाना नाही म्हणून बहुतांश केंद्रे सुरूच झाली नाहीत. आणि सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी केवळ ८ हजार क्विंटल मका खरेदी कोटा मंजूर केल्याचे समोर आले. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी फेडरेशनकडे ३० हजार क्विंटल ची नोंदणी केलेली आहे.
राज्य शासनाने राज्यात फक्त २ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्याच्या अन्य जिल्ह्यात मका खरेदी जास्त झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मका खरेदी करू नये आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी दिल्याने जिल्ह्यातील हमीभाव केंद्रे बंद झालेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना १३०० ते १४०० रुपये दराने मका खाजगी व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे. परिणामी अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मका उत्पादनातही नुकसान सहन करावे लागते आहे.