साखर गोड झाली !

साखरेची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली : खुल्या बाजारातही दरवाढ

टीम : ईगल आय मीडिया

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, साखरेच्या दरात 3600 रुपये क्विंटल पर्यंत झालेली वाढ आणि पुढील हंगामातील कच्च्या साखरेचे सुरू असलेले सौदे यामुळे नवीन हंगामाच्या सुरुवातीला च साखर कारखानदारीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरेच्या भावात वाढ झाल्याने यंदा कारखान्यावरील कर्जाचा भार काही प्रमाणात का असेना कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षात देशातील बहुसंख्य साखर कारखाने तोट्यात चालत आहेत. कोरोना मुळे आलेली बाजारबंदी, टाळेबंदी आणि त्यामुळे साखरेला घसरलेला दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नसलेली मागणी आणि एफआरपी देण्यासाठी घ्यावे लागलेले कर्ज यामुळे हा उद्योग अडचणीत आला होता. केंद्र सरकारने साखरेला 32 रुपयांचा हमी भाव देऊनही साखर उद्योग संकटात होता आणि 35 रुपये हमी भाव देण्याची मागणी होत होती.

मात्र, गेल्या काही दिवसांत ब्राझिलमध्ये साखर उत्पादन कमी झाल्याने भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. आजवर ६० लाख मे. टन साखरेची निर्यात झाली असून अजूनही सुमारे १० लाख मे. टनाची मागणी आहे. पुढील हंगामात उत्पादित होणाऱ्या कच्च्या साखरेचे आंतरराष्ट्रीय सौदे आत्तापासून सुरू झाले आहेत. त्याचा फायदा कारखान्यांना होत असून साखर कारखान्यांना चांगले दिवस आले आहेत.

खुल्या बाजारातील दर प्रति क्विंटल 3600 रूपयेपर्यंत गेला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने टाळेबंदी शिथिल होऊन बाजारात उलाढाल वाढली आहे. कमी दरामुळे गोडावूनमध्ये साखर पडून असलेल्या साखरेची सध्या चांगल्या दराने विक्री सुरू झाली आहे. केंद्राने साखरेला प्रति क्विंटल ३५०० रूपये दर निश्चित करावे अशी कारखानदारांची मागणी आहे.

पूर्वी साखर विकून शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले जात होते. गेली दोन तीन वर्षे कर्ज काढून एफआरपी देण्याची वेळ आली. यंदा मात्र साखरेला बाजारात चांगला दर मिळाल्याने नव्याने कर्ज काढण्याची वेळ येणार नाही. केंद्राने साखरेच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास अजूनही या उदयोगाला चांगले दिवस येतील असे मानले जात आहे.

सरकारने याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी खुल्या बाजारात अचानक दर चांगला मिळाल्याने कारखान्यांना जादा पैसे मिळत आहेत. यामुळे यंदा नवीन हंगाम सुरू करण्यासाठी नवीन कर्ज काढावे लागण्याची शक्यता कमी झाली आहे. सणांचा हंगाम सुरू झाल्याने अजून साखरेला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!