शिवसेनेच्या आंदोलनानंतर सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली
मोहोळ : ईगल आय मीडिया
गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस दराबाबतची प्रतिक्षा आता संपली आहे. शिवसेना नेते नागेश वनकळसे यांच्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना एफआरपी प्रमाणे ऊस दर जाहिर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २९ कारखान्याने ऊसदर जाहिर केले आहेत.
गेल्या दीड ते दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी मिळून 50 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप केले आहे. मात्र त्यांनी ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी कोणताच पुढाकार घेतला नव्हता. त्यामुळे मोहोळ चे शिवसेना नेते नागेश वनकळसे, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले यांच्यासह अन्न पदाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
यावेळी सी रंगराजन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, साखर आयुक्तांनी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची ऊसाची एफ.आर.पी. त्वरित शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत, कारखान्याला ऊस गेल्यापासून १४ दिवसात ऊसाच्या एफआरपीची रकम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कामगारांचे थकीत वेतन त्वरीत द्यावे, शेतकऱ्यांचे मागील २ वर्षापासूनची थकीत ऊस बिले त्वरीत मिळवून द्यावीत, कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या.
या आंदोलनाची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दखल घेतली आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना एफआरपी प्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील पांडुरंग कारखाना श्रीपुर -२४३१, विठ्ठल गुरसाळे- २१०६, दामाजी मंगळवेढा- २११९, जकराया शुगर वटवटे – २०६८, युटोपीयन शुगर- २११६, जय हिंद शुगर -२०५७, गोकुळ धोत्री- २०१८, माऊली शुगर तडवळ- २०८४ ,मातोश्री लक्ष्मी रुदेवाडी- १९५१, सासवड माळी- २२९१, सहकार महर्षी अकलूज -२३२०, संत कुर्मदास लऊळ- २०६७, संत शिरोमणी भाळवणी- २१५२, लोकनेते अनगर- २२८१, इंद्रेश्वर बार्शी- २२२६, भीमा टाकळी- २२८७ ,विठ्ठल रिफायनरी- २१९८, बबनराव शिंदे- २१८२, विठ्ठलराव शिंदे-२३७०, सिद्धनाथ तिऱ्हे-२१२५, सिद्धेश्वर कुमठे -२११८, लोकमंगल भंडारकवठे- २११७, लोकमंगल दारफळ- २०५१, भैरवनाथ आलेगाव-२०९०, मकाई करमाळा-२३२३, भैरवनाथ विहाळ-१९०८, विठ्ठलराव शिंदे २- २३७७, विठ्ठल कारपोरेशन -२१९८, भैरवनाथ लवंगी-१९६१ या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांसमोर पर्याय निर्माण झाले आहेत.
या बाबत बोलताना नागेश वनकळसे यांनी, “ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याची पत पाहूनच आपला ऊस गाळपासाठी पाठवा. कारखाना प्रशासन व्यवहाराला चोख नसेल तर त्या कारखान्याला ऊस अडकून बसू नका, चांगल्या कारखान्याला ऊस घालावा” असे आवाहन केले.