दोन वर्षानंतर उसाच्या हमीदरात 10 रुपयांची वाढ !
टीम : ईगल आय मीडिया
केंद्र सरकारने आगामी गाळप हंगामासाठी उसाचा हमी भाव 2850 रूपये प्रति टन जाहीर केला असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही घोषणा राजा उदार झाला आणि धत्तुरा हाती दिला अशी ठरली आहे. कारण गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारने उसाच्या हमी भावात वाढच केली नव्हती आणि जेव्हा केली तेव्हा फक्त 100 रुपये प्रतिटन वाढवले आहेत. दोन वर्षात वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता 100 रुपये दर वाढ शेतकऱ्यांना धत्तुरा दिल्यासारखी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन ऊस गाळप हंगामासाठी उसाच्या एफ.आर.पी.मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रति क्विंटल फक्त १० रुपये वाढवले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर आता प्रतिटन फक्त 100 रुपये भाववाढ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापूर्वी २०१८ साली एफ आर पी मध्ये वाढ करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी ऊसाची टंचाई असूनही दरवाढ केली नव्हती.
आता केवळ 10 रुपयांची दरवाढ रास्त आणि किफायतशीर दरात करण्याची शिफारस अन्न मंत्रालयाने केली होती. ती मागणी मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्य केली. याच 2850 रुपयात तोडणी वाहतुकीचाही खर्च समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांना या एफ आर पी दरवाढीचा फायदा होणार नाही असे दिसते. 2 वर्षानंतर तोडणी वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे, ती विचारात घेता केंद्राची ही दर वाढ शेतकऱ्यांना धत्तुरा दिल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी संघटनेतून आणि शेतकऱ्यातूनही उमटत आहेत.