उजनीची यंदा आपकमाई : धरणावर पडलेल्या पावसामुळे उपयुक्त साठा

४४० मिमी पावसाची विक्रमी नोंद : पुणे जिल्ह्यातील १२ धरणांवर उजनीपेक्षा कमी पाऊस

नीरा खोऱ्यातही काळजीचे ढग

पंढरपूर : ईगल आय मीडिया
दरवर्षी पुणे जिल्यातील पावसाकडे डोळे लावून असणाऱ्या उजनी धरणावर यंदा मात्र सातत्याने पावसाने दमदार हजेरी लावली असून २ ऑगस्ट पर्यंत ४४० मिमी एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा उजनी ची उणे पातळीकडून अधिक १२ टक्के पर्यंतची पाणी साठा वाढ हि आपकमाई ठरली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांवर यंदा अत्यल्प पाऊस पडला असून यंदा उजनीवर पाऊस नसता तर काय झाले असते अशी चर्चा शेतकऱ्यातून सुरु आहे. दरम्यान , पुणे जिल्यातील धरण क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली असल्याने उजनी धरणात येणारे पाणी बंद असून धरणातील पाणीसाठा वाढ कासवगतीने सुरू आहे. अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष पुणे जिल्ह्यातील पावसाकडेच आहे असे दिसून येते.

उजनी धरण हे कमी पावसाच्या क्षेत्रात आहे मात्र धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टी एम सी एवढी मोठी आहे. कोयना आणि जायकवाडी या धरणांच्या तुलनेत उजनी राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र हे धारण पुणे जिल्ह्यातील पावसावर अवलंबुन आहे. पुणे जिल्ह्यात १९ धरणे असून त्यावर सरासरी १०९६ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्यामुळे सोलापूर जिल्हा किंवा उजनी धरणावर पाऊस नाही पडला तरीही उजनी १०० टक्के भरते आणि भरून वाहते सुद्धा. पुणे जिल्ह्यात नेहमीच अतिवृष्टी होते, मात्र यंदा ऑगस्ट महिना उजाडला तरीही पुणे जिल्ह्यातील धरणे ३० टक्केच्या आसपास भरलेली आहेत . आणि १९ पैकी १२ धरणे ४० टक्केपेक्षा कमी भरलेली आलेत. आंध्रा हे एकच धरण ७० टक्के भरले असून बाकीची ५ धरणे ४० ते ४५ टक्के एवढीच भरली आहेत यंदा पुणे जिल्ह्यातील धरणावर पडलेल्या पावसाचे प्रमाण चिंताजनक असून आजवर एवढा कमी पाऊस कधीच झाला नाही. त्या तुलनेत उजनी धरणावर विक्रमी पाऊस झाला असून पुणे जिल्ह्यातील १२ धरणापेक्षा उजनीवर अधिक ( ४४० मिमी ) पाऊस झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणांवर अशी बिकट परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे. उजनी ची वाटचाल सध्या तरी आप कमाईवर असून तेवढ्याने उजनीचे अवाढव्य पोट भरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेवटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि पाटबंधारे विभागाचेही लक्ष पुणे जिल्ह्यातील १९ धरणांवर पडणाऱ्या पावसाकडेच लागले आहे.


नीरा खोऱ्यातही काळजीचे ढग
बिमा नदीच्या खोऱ्यात पावसाने दडी मारलेली असतानाच भीमेचे उपखोरे असलेल्या नीरा नदीच्या खोऱ्यातही पावसाने दडी मारलेली दिसून येते. नीरेच्या खोऱ्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे नीरा नदीवरील नीरा देवघर २५, वीर ४० तर भाटघर ४० टक्केच भरलेले आहे. नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रात यंदा खूप चांगला पाऊस झाल्याने पाण्याची मागणी नाही त्यामुळे नीरा उजवा लाभक्षेत्रातील तिसंगी तलावासारखे लहान ते माध्यम साठवण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तरीसुद्धा या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचेही लक्ष नीरेच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाकडे लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!