पंढरपूर तालुक्यात युरिया खताची टंचाई

खरिपाच्या काळात लिंकिंगचा “ओव्हर डोस “

पंढरपूर: ईगल आय मिडीया

खरीप हंगामातील मका तसेच इतर चारा पिकांना युरिया खताची गरज असताना, गेला दहा ते बारा दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात युरियाची टंचाई जाणवत आहे. खत दुकानदारांकडे युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
याबाबत कृषी विभागाने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यंदा पावसाला वेळेवर सुरुवात झाली त्यामुळे अनेकांनी मका, बाजरी, ज्वारी यासह चारा पीक घेतली आहेत, तसेच ऊस लागवडही सुरू आहे. या पिकांना इतर रासायनिक खतांची गरज आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तालुक्यात युरिया टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक गावातील शेतकरी युरियाचा शोध घेत फिरत आहेत. याबाबत उपरी ( ता.पंढरपूर ) येथील शेतकरी प्रशांत नागणे म्हणाले, सध्या शेतात उभ्या असणार्‍या मका पिकाला युरिया खताची गरज आहे. मात्र, तो उपलब्ध होत नाही. एका बाजूला केंद्र सरकार आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देत आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला खतांची उपलब्धता नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढणार असा सवाल त्यांनी केला.
कृषी विभागाने याबाबत तातडीने पावले उचलावी अशी मागणी त्यांनी केली.
उपरी येथील जय हनुमान कृषी केंद्राचे संचालक माऊली नागणे म्हणाले, आम्ही युरियाची सातत्याने मागणी करीत आहोत. मात्र तो अद्याप उपलब्ध झालेला नाही. शेतकऱ्यांकडून युरिया खताबाबतची सातत्याने विचारणा होत आहे.
त्याच बरोबर अनेक शेतकरी आणि वितरकाकडून खतासोबत इतर लिंकिंग स्वरूपात कीटकनाशके, खते खरेदीची गळ घातली जात आहे अशाही तक्रारी येत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!