मान्सूनपूर्व खतांची मात्रा देण्याचे काम रखडले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. एकाही दुकानात युरिया उपलब्ध नसल्याने पिकांना खत देण्याचे काम खोळंबले आहे. त्यामुळे लवकरात लवकर युरिया टंचाई दूर करावी अशी मागणी होत आहे.
पंढरपूर तालुक्यात सध्या उसाच्या बांधणी, तसेच अंतर्गत मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. उसाच्या बांधणी वेळी खतांची मात्रा द्यावी लागते. यामध्ये युरिया महत्वाचं घटक असून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पावसाळ्याच्या तोंडावर इतर पिकांना ही खतांची पूरक मात्रा द्यावी लागणार असून युरियाची टंचाई मुळे खतांचा डोस देण्याचे लांबणीवर टाकावे लागत आहे.
सध्या तालुक्यातील एकाही कृषी केंद्रात युरिया मिळत नाही. कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांना युरियाच्या शोधात गावोगावी फिरावे लागते आहे. युरिया मिळत नसल्याने खतांचा पूरक डोस पिकांना देता येत नाही. वेळ निघून जात असल्याने त्याचा विपरीत परिणाम पिकांच्या वाढीवर होत आहे.
लवकरच पावसाळा सुरू होत असून त्याच्या तोंडावर पिकांना पूरक डोस देण्यासाठी युरियाची उपलब्धता व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.