विठ्ठल ची frp पूर्ण : भीमा, सहकार शिरोमणी अडकले !

थक हमी मिळूनही भीमा ,सहकार शिरोमणी समोर आर्थिक अडचणी कायम

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल आणि सहकार शिरोमणी तसेच सीताराम, मोहोळ तालुक्यातील भीमा या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची frp चक्र रक्कम थकलेली आहे. त्यापैकी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने थकीत frp रक्कम पूर्ण करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भीमा आणि सहकार शिरोमणी या कारखान्यासमोरच्या आर्थिक अडचणी अद्यापही दूर झाल्या नसल्याने हे दोन्ही कारखाने frp ची थकीत रक्कम अजूनही देऊ शकेलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्याच्या गाळप हंगामाविषयी सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यातील विठ्ठल, भीमा आणि सहकार शिरोमणी या 3 सहकारी तर सीताराम या खाजगी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची frp ची रक्कम थकीत आहे. त्यामुळे या कारखान्याना गाळपसाठी परवानगी मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. शिवाय या साखर कारखान्याकडे तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगारांचीही देणी असल्याने त्यांच्याकडूनही देणी देण्याविषयी पाठलाग सुरू आहे. राज्य सरकारने विठ्ठल, भीमा, सहकार शिरोमणी साखर कारखान्यास थक हमी देऊन दिलासा दिला आहे.

त्यामुळेच विठ्ठल सहकारी ने आपली 2018-19 या गाळप हंगामातील 177 रूपये प्रती टन थकीत frp रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 6 कोटी रुपये frp रक्कम विठ्ठल ने पूर्ण केली असल्याने विठ्ठल चा गाळप हंगामाचा मार्ग मोकळा झाला असून 25 ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू होत आहे. त्याच बरोबर विठ्ठल ने कामगारांचे पगारही बऱ्याच अंशी पूर्ण केले आहेत. त्यामुळे विट्ठल च्या गाळप हंगामातील सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत. आणि यंदा 13 लाख टन गाळप करण्याचे नियोजन विठ्ठल ने केले आहे.

त्याचवेळी भीमा सहकारी आणि सहकार शिरोमणी यांच्या पुढील आर्थिक अडचणी मात्र अजूनही दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे या कारखान्यानी थकीत frp दिलेली नाही. तोडणी वाहतूक, कामगारांची देणी आणखी आहेतच. दोन्ही कारखान्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात बँकांमध्ये ठिय्या मारला असून लवकरात लवकर रक्कम मिळावी आणि गाळप हंगाम सुरू करावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप तरी या दोन्ही कारखान्यास आर्थिक अडचणीतून मार्ग सापडलेला दिसत नाही. त्यामुळे या कारखान्याच्या सभासद, शेतकरी, कामगार आणि तोडणी वाहतूक ठेकेदारांचे आर्थिक अडचण कधी दूर होते याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!