दिवाळी झाली तरीही विठ्ठलचा दिवा पेटला नाही !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील 28 हजारांहून अधिक शेतकरी सभासद संख्या, आणि तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना दिवाळी झाली तरीही सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. घरोघरी दिवाळीचे दिवे पेटले, दारोदारी फटाके फुटले तरी शेतकऱ्यांचा हा “राजवाडा” मात्र अंधारात बुडालेला आणि स्मशान शांततेत उभा दिसत आहे.
विठ्ठल सहकारी यंदाच्या हंगामात सुरू होणे अनिश्चित असल्याने सभासदांना थकीत ऊस बिलाची, आपल्या शेतात उभा असलेल्या ऊसाची आणि कामगारांना त्यांच्या पगाराची प्रतीक्षा लागलेली आहे. मात्र चेअरमनसह संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी सुद्धा मूग गिळून गप्प असल्याने विठ्ठल सहकारी यंदा सुरू होणार की नाही याचीच चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घालणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या चार दशकांहून अधिक काळ शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या रोजी रोटीचा आधार ठरलेला आहे. दरवर्षी दिवाळी सणापूर्वी ऊस बिलापोटी सभासदांना दिवाळी हप्ता मिळायचा, ऊस पुरवठा सभासदांना सवलतीच्या दरात पोत्याने साखर मिळायची. कामगारांना बोनस, आणि ज्यांच्या कारखान्याकडे ठेवी आहेत त्याना ठेवींवरील व्याज दिवाळीच्या अगोदर मिळायचे. त्यामुळे विठ्ठल च्या सभासदांची, कामगारांची दिवाळी दणक्यात व्हायची.
दसरा सणापासूनच विठ्ठलच्या सभासद, कामगारांना नवीन हंगामाचे वेध लागायचे. पंढरपूर च्या बाजारातील उलाढाल वाढायची. मात्र आता हे सगळे इतिहासजमा झाले असून, या बाबतीत केवळ भूतकालीन चर्चा आणि गप्पांचे फड रंगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आर्थिक अरिष्ट ओढवले होते. याची अनेक कारणे असली तरीही यंदा कारखाना सुरू होण्यास विलंब होण्यामागे नेतृत्व कमकुवत असल्याची चर्चा सुरू आहे.
कारखान्याची धुरा सुमारे 18 वर्षे यशस्वीपणे सांभाळणारे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठलच्या संचालक मंडळात दुफळी निर्माण झाली आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यात अननुभवी चेअरमन भगीरथ भालके यांना यश येताना दिसत नाही. त्यामुळे यंदा कारखाना सुरू होणार का ? नाही, अशी शंका विचारली जात आहे.
विठ्ठल सहकारी ची गाळप क्षमता प्रतिदिनी 9 ते 10 हजार मे.टन इतकी आहे. सभासदांचा सुमारे 12 ते 14 लाख टन शेतात उभा आहे. कारखान्याचे वीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प असे सह प्रकल्प असल्याने एवढी मोठी संस्था बंद राहणे तालुक्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम करणारे ठरणार आहे.
तालुक्यातील सर्व साखर कारखाने यंदा सुरू झाले आहेत. जे मागील काही वर्षे बंद होते ते कारखानेसुद्धा यंदा सुरू झाल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह जरूर आहे. मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू होतो की नाही, हे स्पष्ट नसल्याने या कारखान्याचे सुमारे सभासद चिंताग्रस्त आहेत. दिवाळी सणानिमित्त तालुक्यातील अन्य साखर कारखान्याच्या सभासदांची ‘दिवाळी’ होत असताना विठ्ठल च्या सभासदांना मात्र अंधारात बुडालेला “आपला राजवाडा” पूर्व वैभवाने उजळणार की नाही याचीच चिंता लागली आहे.