वारकरी शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
टीम : ईगल आय मीडिया
पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिले आहेत.
कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांना ते यासंदर्भात पत्र सुद्धा लिहिणार आहेत.
विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.