यंदाही आषाढी वारी एस टी बस मधून

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची काल बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.

या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 40 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.


दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!