कोरोनामूळे बाधित होते : अकलूज येथे घेतला अखेरचा श्वास
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राष्ट्र संत कैकाडी बाबांचे पुतणे हभप रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाने एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
वारकरी संप्रदायामध्ये कैकाडी बाबांचे स्थान मोठे असून त्याच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली म्हणून उपचारासाठी अकलूज येथे दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची शुक्रवारी दुपारी 3.४० च्या सुमारास प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या भक्त गणात शोककळा पसरली आहे.
संत कैकाडी बाबा, हभप कोंडीराम काकांचे अध्यात्मिक कार्य रामदास जाधव महाराज यांनी अतिशय नेटाने पुढे चालवले होते. संत गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार, बहुजन समाजातील युवकांना जागृत करण्याचे मोठे काम रामदास महाराज यांनी सुरू केले. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू ला पंढरीतून विठ्ठलाचा पालखी सोहळा, संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मनमाड हुन पालखी सोहळा त्यांनी सुरू केला होता.
येथील विश्व पुण्यधाम मधून जगाला अध्यात्म आणि विज्ञान यांचे दर्शन देणारी अभिनव सृष्टी त्यांनी उभारून संत कैकाडी बाबा, कोंडीराम काकांचे स्वप्न पूर्ण केले होते. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथा – परंपरा यावर रामदास महाराज कठोर शब्दात प्रहार करीत असत. त्यामुळे बहुजन समाजातील युवक वर्गात त्यांची विशेष क्रेझ आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.