संत नामदेवांचा 670 वा समाधी सोहळा साधेपणाने साजरा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा 670 वा संजीवन समाधी सोहळा शनिवार दि. 18 जुलै रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.

संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोणालाही प्रवेश न देता फक्त महाराज मंडळींच्या उपस्थितीत भजन, किर्तन, प्रवचन आंदी धार्मिक कार्यक्रम झाले. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत गुरुवारी एकादशी दिवशी नामदास महाराज व फक्त 3 सेवेकर्‍यांनी दिंडी काढून नगर प्रदक्षिणा केली. शनिवार दि. 18 रोजी संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम झाला. संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारीत ह.भ.प. नामदास महाराजांचे किर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिवशी पहाटे व दुपारी श्री केशवराज, संत नामदेव-जनाबाई यांची महापुजा मानकरी शिवकुमार भावलेकर, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. तसेच समाजाचे विश्वस्त शशिकांत जवंजाळ यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला.

दरम्यान संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले.

समाधी सोहळा कार्यक्रमासाठी सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्यासह विठ्ठल, एकनाथ, मुरारी, निवृत्ती, हरी, भावार्थ महाराज व नामदास परिवाराने परिश्रम घेतले.

कोरोनामुक्तीचे साकडे देश व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक याला बळी पडत आहेत. तरी देश व राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे कोरोनापासून रक्षण कर असे साकडे ह.भ.प. नामदास महाराज व पुजेचा मान मिळालेल्या मानकर्‍यांनी श्री केशवराज (विठ्ठल) व संत नामदेव महाराजांच्या चरणी घातले.

Leave a Reply

error: Content is protected !!