पंढरपूर : ईगल आय मीडिया
आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दररोजचे नित्योपचार थांबविण्यात येत असतात. या कालावधीत देवाचा पलंग काढून श्री विठ्ठलास लोड व रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आलेला असतो. आषाढी वारीसाठी श्रीविठ्ठलाचे अखंड २४ तास भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा राहातो, त्यामुळे श्री विठ्ठलाचा थकवा घालविण्यासाठी प्रक्षाळ पूजा असते. प्रक्षाळपूजे नंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे नित्योपचार सुरू करण्यात येतात. आषाढी यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द जरी झाली असली तरी परंपरेनुसार प्रक्षाळपूजा करण्यात आली. यावेळी प्रक्षाळपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते झाली.
पहिल्यांदा नित्यपूजा करण्यात आली, दुपारी २ वाजता गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. देवाला गंध लावून, हार घातला गेला. देवाच्या अंगाला लिंबूसाखर लावण्यात आले. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस नित्यपूजा, पहिले स्नान, महाअभिषेक, पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. त्यानंतर महानैवेद्य व आरती, धुपारती, शेजारती असा नित्य क्रमाने प्रक्षाळ पूजा झाली.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते़. शुक्रवार पासून श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. कोरोनाचा संसर्गजन्य महामारीमुळे शासनाने दिलेल्या नियमानुसार पारंपरिक पध्दतीने पार पाडण्यात आली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस १४ पदार्थांपासून बनविला काढा.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा थकवा दूर व्हावा, यासाठी खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात आला होता़ हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगण्यात आले़.