मुंबई : ईगल आय मीडिया
राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधीक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.
आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ४२४२ (आतापर्यंत एकूण ३९ हजार ९७६) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ५६८ (आतापर्यंत एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (आतापर्यंत एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (आतापर्यंत एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण ८११) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.