टीम : ईगल आय मीडिया
हैद्राबादमधील ‘भारत बायोटेक’तर्फे विकसित करण्यात आलेली करोना प्रतिबंधक ‘को-व्हॅक्सिन’ लस इस्लामपूरमध्ये २२५ जणांना देण्यात आली. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सध्या सुरू आहेत. या अंतर्गत इस्लामपूरमधील प्रकाश मेडिकल सेंटरमध्ये हे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासराष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिली आहे.
लसीकरण मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माजी आ. शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. ‘को-व्हॅक्सिन’च्या एक हजार लशी इस्लामपूरसाठी आल्या असून यासाठी ५० वर्षांवरील स्वयंसेवक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची निवड करण्यात येत आहे.
बुधवापर्यंत २२५ जणांना लस देण्यात आली असल्याचे डॉ. अभिमन्यू पाटील यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेमध्ये डॉ. विजय पाटील, डॉ. प्रदीप कुलकर्णी हे आहेत.
ही लस सहा ते आठ अंश सेल्सियस तापमानामध्ये ठेवणे आवश्यक असल्याने तशी व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या आठवडय़ामध्ये एक हजार स्वयंसेवकांना ‘को-व्हॅक्सिन’चे लसीकरण करून त्याचा अहवाल भारत बायोटेकला पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.