बाळ – बाळंतीण सुखरूप
पंढरपूूूर : ईगल आय मीडिया
करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार सरवदे व स्टाफ यांनी करकंब येथे मंगळवारी पॉझिटिव्ह महिलेचे बाळंतपण सुरक्षित व सुखरूप करून दाखवले आहे. महिला रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्यावर यशस्वी उपचार करणे हे डॉक्टरांसाठी एक जोखमीचे व धाडसाचे ठरते. परंतु हे सर्व करकंब ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.तुषार सरवदे व स्टाफने हे शक्य करून दाखवले आहे.
सध्या देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पहावयास मिळत आहे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे. रुग्णालयात जाताच कोरोना चाचणी करावी लागते. नंतर ऍडमिट करून घेतले जाते महिला रूग्ण पॉझिटिव्ह असेल तर बाळंतपण सुखरूप होणे ही कसोटी व धाडसाचे ठरते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अविश्रांत सेवा बजावणारे डॉ.तुषार सरवदे ज्यांनी सहा ते सात वर्षांमध्ये जिल्हाभरात जवळपास 30 हजार दुर्बिणीद्वारे बिनटाका कुटुंबकल्याण यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. या कामगिरी मुळे प्रत्येक वर्षी त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाले आहेत.कोरोना दुसऱ्या लाटेत त्यांनी करकंब रुग्णालयात ७ सीझर १४ बाळंतपण केले आहेत.
नुकतीच आष्टी येथील महिला बाळंतपणासाठी पंढरपूरला गेली. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या महिलेला सोलापूर शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रेफर केले. तिथे गेल्यावर या महिलेच्या नातेवाईकांनी करकंब येथे बाळंतपणासाठी चौकशी करून करकंब ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दाखल केले.
डॉ. तुषार सरवदे यांनी परिस्थिती ओळखून या महिलेस रुग्णालयात ऍडमिट करून घेतले. मंगळवारी सकाळी या महिलेस पीपीई किट परिधान करायला लावून रुग्णालयातील सहकारी सिस्टर अनिता कांबळे व आदेश साखरे यांनी ही सूचनांचे पालन करीत, पीपीई किट परिधान करून या महिलेची सुखरूप प्रसूती केली.
ही महिला व जन्मास आलेली कन्या आता सुखरूप असल्याने रुग्णांच्या नातेवाईक यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे, सिस्टर अनिता कांबळे, आदेश साखरे व सम्पूर्ण स्टाफचे आभार मानले. करकंब आरोग्य विभागाच्या यशस्वी कामगिरी मुळे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.