टीम : ईगल आय मीडिया
चिपळूणमध्ये गुरुवारी आलेल्या महापुरामुळे येथील दोन कोविड केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या १० रुग्णांचा मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेतील ८ जण अपरांत हॉस्पिटलमध्ये, तर २ जण अन्य एका कोविड केंद्रामध्ये उपचार घेत होते.
या केंद्रांमधील प्राणवायू पुरवठ्यासह सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणेमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्याची पातळी वाढत गेली. दुपारपर्यंत या केंद्रांना पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी काहीजणांना बाहेर काढणेही अशक्य झाले. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू ओढवला, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.