3 केंद्रावर 692 लोकांनी घेतली लस
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपुर तालुक्यात उपलब्ध लसीकरणाचे योग्य नियोजन केले जात असल्याने लसीकरण वेगाने सुरू आहे असे दिसून येते. शनिवारी गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 3 लसीकरण केंद्रावर 692 लोकांचे लसीकरण झाले असून शनिवारी झालेले लसीकरण सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक झाले आहे. त्यामुळे गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण संदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत असल्या तरी पंढरपूर तालुक्यात लसीकरण जोमाने सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख उतरणीला लागला असताना आता आरोग्य विभागाने कोरोना लसीकरनावर लक्ष दिले आहे. आषाढी यात्रा जवळ येत असून तोवर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने काटेकोर नियोजन केले जात असल्याचे दिसते.
पंढरपूर शहराजवळ असलेल्या आणि तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित झालेल्या वाखरी, गादेगाव अशा गावात जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील आठवड्यात 2 वेळा लसीकरण झाले असून शनिवारी गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या वाखरी, सोनके केंद्रावर ही लसीकरण झाले आहे. शनिवारी गादेगाव, वाखरी, सोनके या 3 केंद्रावर 692 लोकांचे लसीकरण झाले आहे.
एकट्या वाखरी केंद्रावर वाखरी, खेडभाळवणी, कौठळी, शिरढोन या चार गावातील 321 लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिले जात असून त्यानंतर शासन आदेशानुसार जेष्ठ , सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून शांततेत लसीकरण होत असल्याचे दिसते.