यंदा मागील विश्वविक्रम मोडू : प्रा. शिवाजी सावंत यांचा विश्वास
पंढरपूर : eagle eye news
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर्स यांच्या संयुक विद्यमाने चार ठिकाणी आरोग्य महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रुग्ण तपासणीचा मागील वर्षीचा विश्वविक्रम यावर्षी आम्ही मोडू अशा विश्वास भैरवनाथ शुगरचे चेअरमन, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. येथील ६५ एकर मैदानात महाआरोग्य शिबिराचा भव्य शामियाना उभा करण्यात आलेला असून त्याठिकाणी प्रा. सावंत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अरुण लटके, सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने, गुरुनाथ ठिगळे, श्याम सावजी, दत्तात्रय पवार, रुपेश कोळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. सावंत म्हणाले कि, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगर्सच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ११ लाख ६४ हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केल्याची नोंद गिनिज बुक मध्ये झालेली आहे. यंदाही त्याच प्रमाणे ६५ एकर, वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता या ठिकाणी हि आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यासाठी पावसाची शक्यता लक्षात घेऊन वाटरप्रूफ शामियाने उभारण्यात येत आहेत. याठिकाणी निवासी डॉक्टर्स असतील. आरोग्य कर्मचारी, भैरवनाथ शुगर्स , जयवंतराव सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी, कार्यकर्ते, शिवसैनिक असे हजारो स्वयंसेवक वारकाऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहेत.
यंदा अतिशय चांगला पाऊस झालेला आहे, यंदा भक्तांची सांख्य त्यामुळे वाढणार आहे, पावसाचा हंगाम आहे, पाऊस पडतो आहे हे लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा दिली जाणार आहे. याठिकाणी प्राथमिक उपचार, थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोळे, कान, नाक तपासणी सह अंगदुखी पासून भाविकांच्या ज्या आरोग्यविषयक तक्रारी असतील त्यावर येथे उपचार केले जाती. गरजेनुसार पुढील उपचारासाठी शासनाकडून व्यवस्था केली जाईल. त्यासाठी बाकीची सुविधा भैरवनाथ शुगर्स कडून पुरवली जाईल. गेल्या वर्षी ११ लाख ६४ हजार भक्तांची तपासणी केली होती, चष्मे सुद्धा दिले होते, यंदा ते विक्रम आम्ही मोडू याची खात्री आहे. या महाआरोग्य शिबिरास भेट देऊन भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रा. सावंत यांनी केले.