भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रवेश

ब्रिटनहून परतलेल्या सहा जणांमध्ये नवीन जिनोम आढळला

टीम : ईगल आय मीडिया

भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या विषाणूचा शिरकाव झाला असून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण 6 जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे.

इंग्लंडमधून आलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत.
या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे , तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.


भारताकडून हवाई वाहतुकीवर बंदी
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारत सरकारने तातडीने पावलं उचलत 23 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत यूकेवरुन येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जात आहे. त्यानंतर त्यांच्या नमुन्यांची जीनोम सीक्वेन्सिंग तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची माहिती मिळाल्यानंतर नॅशनल टास्क फोर्सने बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.


25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबर दरम्यान, जवळपास 33 हजार प्रवासी यूकेहून भारताच्या विविध विमानतळावर पोहोचले. या सर्व प्रवाशांचा राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आरटी-पीसीआर चाचणी करुन त्यांची नोंद ठेवली जात आहे. आतापर्यंत 114 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने देशातील ही दहा प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत. माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


दरम्यान, कोरोनाव्हायरसाचा नवा स्ट्रेन 70 टक्के वेगाने परसतो. त्यामुळे याबाबत अतिशय सतर्कता बाळगली आहे, असं वैज्ञानिकांनी ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सांगितलं होतं. ज्या कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा लसीच्या निर्मितीवर परिणाम होणार नाही.


या देशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सुरुवात ब्रिटनमधून झाली होती. यानंतर यूरोपातील अनेक देशांमध्ये नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, डेन्मार्क, नेदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!