मोठ्या शहरात चिंताजनक स्थिती
मुंबई : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मोठा शहरांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कठोर निर्बंधाचे निर्णय घेतले जात आहे. प्रशासनानं निर्बंध घातले असले तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. राज्यातील काही शहरांतील कोरोना स्थितीचा आढावा आपण इथे घेणार आहोत.
राज्यात आज दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे. दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.
पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच 5 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात पुणे शहरातील रुग्णसंख्या 2 हजार 500 पेक्षा जास्त होती. तर पिंपरी-चिंचवड मध्ये जवळपास 1 हजार 200 रुग्ण सापडले होते.
नागपुरात आज पुन्हा एकदा कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात तब्बल 3 हजार 796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात आज कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 40 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 625 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 3 हजार 728 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात 203 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 117 जण कोरोनातून मुक्त झालेत. जिल्ह्यात आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात उस्मानाबाद तालुक्यात 45, कळंब तालुक्यात 59, उमरगा तालुक्यात 15 तर परंडा तालुक्यात 14 रुग्ण आढळले आहेत.