टीम : ईगल आय मीडिया
अंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे भारतातही सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी महाराष्ट्रात पेट्रोलने ८० रुपायांची पातळी ओलांडली तर डिझेलही ७० रुपयांच्या पार झाले आहे. विशेष म्हणजे एप्रील महिन्यात इंधनाचे बाजारातील मूल्य २० वर्षातील सर्वात खाली आल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना मिळू दिला नाही. तर आपला नफा वाढवणे योग्य समजले. २०१७ पासून भारतीय तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या दराचा रोजचे रोज आढावा घेऊन दर कमी जास्त करीत होत्या. मात्र मागील ८२ दिवसात तेलाचा दर कमी होताच तेल कंपन्यांनी दररोज घेतला जाणारा आढावा बंद ठेऊन ग्राहकांना तेलाच्या किमतीतील घसरणीचा लाभ होणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र आता तेलाच्या किमतीत वाढ सुरु होताच या कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरु केली आहे. यामुळे अगोदरच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोल ८० च्या वर गेला तर डिझेलचाहि दर वाढून प्रति लिटर ७१. १७ रुपये इतका झाला आहे.