शिक्षण मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
टीम : ईगल आय मीडिया
3 दिवसांपूर्वी सत्तारूढ झालेल्या नितीशकुमार सरकारच्या शिक्षणमंत्र्यांना पदाची जबाबदारी स्वीकारताच 3 दिवसात राजीनामा द्यावा लागला आहे. पदाची शपथ घेताच शिक्षणमंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलं होतं. त्यामुळे शपथविधीनंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी चौधरी यांना राजीनामा सोपवावा लागलाय.
सोमवारी राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात नितीशकुमार यांच्यासह १४ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपकडून सात, जेडीयूकडून पाच, हम आणि व्हीआयपी पक्षाच्या प्रत्येकी एका मंत्र्यांने शपथ घेतली होती. यातच जेडीयु च्या मेवालाल चौधरींचाही समावेश होता.
सरकार स्थापन होताच शिक्षणमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री नितीशकुमारही वादात सापडले. याच दरम्यान चौधरी यांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आणि आज (गुरुवारी) मेवालाल चौधरी यांना राजीनामा दिला.
सबौर विद्यापीठाचे कुलपती पदावर नियुक्त असताना मेवालाल चौधरी यांच्यावर नियुक्ती घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण अद्याप भागलपूर अतिरिक्त महासंचालकांच्या विचाराधीन असून अद्याप याविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही.