टीम : ईगल आय मीडिया
भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत पश्चिम बंगालमध्ये भाजपाचेच शेकडो कार्यकर्ते गावभर फिरुन विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याबद्दल जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते ‘ भाजपा फ्रॉड पक्ष’ आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन घोषणा देत, गावभर फिरत जनतेची माफी मागत आहेत.
बीरभूम जिल्ह्यातल्या लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. या माफिनाम्यामध्ये सांगण्यात आलं की भाजपाने गोड बोलून गळ घातली होती, पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मात्र, भाजपाचा असा आरोप आहे की या सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे.
मुकूल मंडल नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भाजपाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भाजपाचे ३०० कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले. यापैकी एक म्हणजे भाजपाचे माजी युवा मोर्चा मंडल अध्यक्ष तपस साहा. ते सांगतात, आम्ही चुकून भाजपामध्ये गेलो. आम्ही ममता यांच्या कामाच्या समर्थनार्थ आजच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहोत. मी भाजपासाठी काहीही करु शकत नाही, पण मी तृणमूलच्या विकासकामामध्ये सहभागी व्हायला जात आहे.
तर धनियाखलीमध्ये तृणमूलच्या नेत्यांनी आपल्या आडगेपणाच्या आणि वाईट वर्तनाबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि अनेकांनी आता नव्याने सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. तर हुगलीमध्ये भाजपा नेत्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात आहे.