टीम : ईगल आय मीडिया
लोकसभेत पूर्ण बहुमत असूनही राज्यसभेत ते नसल्यामुळे वारंवार विरोधकांच्या कोंडीत सापडणाऱ्या भाजप प्रणित एन डी ए ची वाटचाल बहुमताकडे दमदारपणे सुरु आहे. शुक्रवारी झालेल्या १९ जागांच्या निवडणुकीनंतर ११ जागा जिंकल्याने भाजप आघाडी १०१ जागांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे राज्यसभेत भाजप आघाडी प्रथमच १००च्या वर पोहोचली आहे.तर आजवर राज्यसभेतील बहुमताच्या जोरावर भाजपला वेसण घालण्याचा प्रयत्न करणार्या काँग्रेस आघाडीची मात्र मोठी पीछेहाट झाली आहे.
वरिष्ठ सभागृह मानले गेलेल्या राज्यसभेत एकूण २४५ इतकी सदस्य संख्या आहे. बहुमतासाठी १२३ सदस्यांची गरज असते. २०१४ साली भाजपने एकट्याने २७५ जागांसह भाजपआघाडीने ३०० पेक्षा जास्त जागा जिंकूनही राज्यसभेत भाजप आघाडीला बहुमत मिळवून देईल एवढे संख्याबळ नव्हते. त्यामुळे भाजपला मागील ५ वर्षात राज्यसभेत विधेयक सादर करताना आणि मंजूर करून घेताना छोट्या पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत होत्या. त्यामळे अनेक महत्वाचे निर्णय, विधेयके राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे प्रलंबित राहत होती. भाजप आघाडीची हि कटकट 2022 पर्यंत दूर होणे दृष्टीपथात आले आहे.
शुक्रवारी ८ राज्यातील १९ जागांसाठी निवडणूक झाली तर त्यापैकी भाजपने ९ जागा जिंकल्या आहेत. मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ३ पैकी २ जागा बिनविरोध जिंकत भाजपने मार्चपासून २१ पैकी ११ जागा जिंकल्या आहेत. भाजपचे आता राज्यसभेत एकट्याचे ८६ सदस्य झाले असून भाजप मित्रपक्ष मिळून एन डी ए कडे १०१ संख्याबळ झाले आहे.
त्याशिवाय गरज पडेल तेव्हा बिजू जनता दल, ए आइ ए डी एम के, वाय एस आर काँग्रेस, डी एम.के. अशा पक्षांचे पाठबळ सहज मिळवून हवे ते कायदे सभागृहात मंजूर करून घेणे आता अधिक सोयीचे झाले आहे.
याउलट काँग्रेस प्रणित यु पी ए चे संख्याबळ घटत असून राज्यसभेत आता काँग्रेस आघाडीचे केवळ ६५ सदस्य आहेत. त्यामुळे राज्यसभेत काँग्रेस आघाडीची सद्दी संपत आली आहे. कलम ३७० रद्द करण्यासारखे महत्वाचे निर्णय भाजपने पुरेसे संख्याबळ जवळ नसतानाही चाणाक्षपणे रेटून नेले. त्यामुळे पुढच्या काळात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीही सभागृहात भाजप आघाडी प्रबळ झाल्याने भाजपला हवे ते कायदे मंजूर करवून घेणे सहज शक्य होणार आहे.