मंत्री नाईक यांच्यावर गोव्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटक कारवार जिल्ह्यातील अंकोला येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा सहाय्यक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला आहे.
दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. नाईक यांना योग्य उपचार देण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणालेत. तर गरज पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने दिल्ली हलवावं, असंही राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितलं.
केंद्रात मंत्री असलेले ६८ वर्षीय श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील भाजपचे खासदार आहेत. नाईक यांच्यावर केंद्रात आयुष मंत्रालय तसेच संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे. कारमध्ये नाईक यांच्यासह एकूण चार जण होते.
या भीषण अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह नाईक यांच्या स्वीय सहायकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी दिली.नाईक यांना योग्य उपचार द्यावेत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला. श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याला हलविण्यात आलं आहे.