टीम : ईगल आय मीडिया
कोलकाताच्या स्ट्रँड रोडवर दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला सोमवारी रात्री भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 2 रेल्वे कर्मचार्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दक्षिण-पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे. मृतांमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आली. सोमवारी संध्याकाळी साधारण सव्वासहाच्या सुमारास 13 व्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्याचे समजल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तातडीने 13 व्या मजल्यावर पोहोचले. त्यांनी बहुतांश कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत :मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
सोमवारी रात्री हे सर्वजण एका लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होते. त्यावेळी इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट बंद पडली. या दुर्घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
साधारण साडेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान इमारतीमध्ये आले. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी रेल्वे अधिकारी पार्था सारथी मंडल आणि एस सहनी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत रेल्वे व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. आम्ही या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.