दिल्ली हिंसाचार : 18 पोलीस जखमी : 1 शेतकरी ठार

टीम : ईगल आय मीडिया

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये 18 पोलीस जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर हरियाणाममध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.


आज दुपारी लाल किल्लामार्गे शेतकऱ्यांची रॅली निघणार होती. पण ही रॅली रोखण्यात आली. शेतकऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून न जाता वेगळ्याच मार्गाने रॅली काढल्याने पोलिसांनी त्यांना अडवले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे हिंसा भडकली. या हिंसाचारात 18 पोलीस जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून या सर्व पोलिसांना एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



दरम्यान, दिल्लीतील हिंसक आंदोलनाची केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, क्राईम ब्रँच आणि तिन्ही झोनच्या स्पेशल पोलीस आयुक्तांची आज बैठक पार पडली. त्यात राजधानी दिल्लीत ज्या ज्या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आमि ड्रोन फुटेज सीज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

शेतकऱ्याचा मृत्यू
दरम्यान, ही हिंसा सुरू असतानाच एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय. नवनीत सिंह असं या मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे. तो 30 वर्षाचा असून उत्तराखंडचा रहिवासी आहे.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. सरकारी कार्यालय, वाहनांसहीत राज्य सरकारच्या मालमत्तेचं नुकसान करून कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस बळाचा वापर करण्यासही मागे पुढे हटणार नाही, असा इशारा हरियाणाच्या डीजीपींनी दिला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दंगल भडकवणाऱ्या आणि अफवांद्वारे दंगल भडकवणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!