कर्ज बाजरी झाल्याने शेतकरी कुटुंबाने संपवले जीवन
टीम : ईगल आय मीडिया
शेती साठी काढलेलं कर्ज कसं भरणार?, असा प्रश्न पडल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांनी शेततळ्यात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून सहा जणांचे मृतदेह काढले. तसेच शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. कर्नाटकमधील यादगीरमध्ये ही घटना घडली आहे.
भीमराव सुरापुरा, त्यांची पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज आणि मुली सुमित्रा, श्रीदेवी, लक्ष्मी अशी त्यांची नावं आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांचे मृतदेह वर तरंगताना काही जणांनी पाहिल्यानंतर घटनेची माहिती मिळाली, असं पोलिसांनी सांगितलं.
फळबागांचं पिक घेण्यास अपयश आल्याने जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं देखील वाढलं होतं, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
“सहा जणांनी यादगीरमधील तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी त्यांच्या शेतात फळबाग फुलवली होती. मात्र त्यांना त्यात यश न आल्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे”, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.