सदाबहार गायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचं कोरोना मूळे निधन

हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड भाषांतील 40 हजाराहून अधिक गीतांचा स्वर साज हरपला

टीम : ईगल आय मीडिया

एक दुजे के लिए, सागर, प्रेम कैदी, गर्दीश या सारख्या हिंदी आणि असंख्य दाक्षिणात्य भाषेतील सुप्रसिद्ध गायक एस पी बाल सुब्रह्मण्यम यांचं आज दुपारी कोरोनमुळे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती.  मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एक दुजे के लिए, सागर, प्रेम कैदी, मैने प्यार किया, साजन, पत्थर के सनम, हम आप के है कौन, गर्दीश या सह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड भाषेतील असंख्य गीतांना एस पी बाल सुब्रह्मण्यम यांनी आपला स्वर साज चढवला होता. त्यांनी गीत गायना सोबतच दक्षिणात्य सिनेमातही अनेक संस्मरणीय भूमिका केल्या. 6 वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर मैने प्यार किया साठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायनाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलेब्रिटीनी ट्विट करून एस पी ना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!