गुजरातमध्ये 71 दिवसांत 1 लाख 24 हजार मृत्यू

गुजराती दैनिकाने दिलेल्या वृत्तानंतर खळबळ

एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये स्मशानभूमीत अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या शव वाहिकांची रांग लागल्याचे दिसून आले आहे.

टीम : ईगल आय मीडिया

गुजरातमध्ये गेल्या 71 दिवसात तब्बल 1.23 लाख नागरिकांचे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून राज्यातील 33 जिल्ह्यात आणि 8 मनपाकडून 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 इतके मृत्यू दाखले देण्यात आले आहेत. यातील बहुतांश मृत्यू कोरोनाचे असल्याची चर्चा असली तरी राज्य सरकारने मात्र कोरोना मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवली आहे.

गुजरातमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे. अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या शहरांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी रांगा लागल्या आहेत. मृतांची संख्या वाढली असताना सरकारी खात्यांनी दिलेल्या आकडेवारीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गुजराती दैनिक दिव्य भास्कर ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.

गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेले मृत्यू आणि जारी करण्यात आलेले डेथ सर्टिफिकेटचे आकडे यांच्याशी तुलना करता, जे ताजे आकडे समोर आले आहेत ते दुप्पट आहेत. गुजरातमधील वृत्तपत्र ” दिव्य भास्करने” 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या मृत्यू दाखल्यांवरुन एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत.

यावर्षी मार्च महिन्यात राज्यात एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे.

पाच महानगरांमध्यील मृत्यू दाखल्यांची आकडेवारी

शहर                    कोरोनाने मृत्यू                 मृत्यू दाखले
अहमदाबाद            2126                             13593
सूरत                       1074                              8851
राजकोट                  288                             10887
वडोदरा                   189                               7722
भावनगर                 134                                  4158

मागील वर्षी आणि यावर्षी जे मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत, त्यांची तुलना करता भयावह स्थिती दिसते. मार्च 2020 मध्ये 23 हजार 352, एप्रिल 2020 मध्ये 21 हजार 591 आणि मे 2020 मध्ये 13125 मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र यावर्षी म्हणजे 2021 मध्ये जे आकडे समोर आले आहेत ते दुपटीपेक्षा जास्त आहेत. 71 दिवसात 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. यापैकी केवळ 4218 जणांचा मृत्यू हा कोरोनाने झाल्याची नोंद गुजरात सरकारने केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!