फटाक्याच्या कारखान्यात स्फोट : 11 जणांचा भाजून मृत्यू

विरुध नगर येथील दुर्घटना : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

टीम : ईगल आय मीडिया

तामिळनाडूमध्ये विराधूनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागून 11 जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडलीय. फटाक्यांच्या कारखान्यात आग कशी लागली? याबाबत मात्र अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खा.राहुल गांधी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी दुपारी १.४५ मिनिटांनी ही घटना घडल्याचं समजतंय. सत्तूर, शिवकाशी आणि वेम्बकोट्टईमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत जवळपास चार फटाके बनवणारे मोठे शेड नष्ट झाले आहेत.

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलंय. ‘तामिळनाडूच्या विरुधुनगर स्थित एका फटाक्यांच्या कारखान्यात लागल्याची घटना दु:खद आहे. या दुर्दैवी क्षणाला पीडितांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत पुरवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे’ असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा फटाके बनवण्यासाठी केमिकलचा वापर केला जात होता. आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवळपास ३० गाड्या दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, फटाक्यांच्या कारखान्यात आतमध्ये वारंवार स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. तसंच आगही वारंवार भडकताना दिसत होती. त्यामुळे आत प्रवेश मिळवणं अग्निशमन दलाच्या जवानांनाही कठीण होऊन बसलं.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबांना २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत पुरवण्यात येईल, असंही पंतप्रधानांनी जाहीर केलंय. या घटनेवर राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त करतानाच राज्य सरकारला जखमींना मदत करण्याची आणि आत अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याची विनंती केलीय.

Leave a Reply

error: Content is protected !!