१३ लाखांच्या उंबरठ्यावर रुग्ण संख्या ; ३० हजार ६०० बळी
टीम : ईगल आय मीडिया
देशात सुरु असलेला कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नसून रुग्ण वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. शुक्रवारच्या २४ तासात देशात आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णांची वाढ आहे. शुक्रवारी सायंकाळी देशातील रुग्णसंख्या १२ लाख ९२ हजार २०९ इतकी झाली असून देशात एकूण ३०,६६० करोनाबळी झाले आहेत.
देशातील करोना रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. देशभरात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.३० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत ८,१७,७४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४३,८०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत देशात करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्रात ९८९५ नवे बाधित
राज्यात गेल्या २४ तासात ९८९५ नवे करोनाचे रुग्ण आढळले. याच काळात २९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातील रुग्ण संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात करोनामुळे आतापर्यंत १२,८५४ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यांशी समन्वय साधून केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे.