५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आले होते संपर्कात
टीम : ईगल आय मीडिया
राम मंदिर निर्माण ट्रस्ट चे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी त्यांची तपासणी केल्यानंतर हि बाब समोर आली असून ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे उत्तरप्रदेशात खळबळ उडाली आहे. अनेक जण स्वतःहून क्वारंटाईन झाले आहेत तर आपापल्या कोरोना टेस्ट करून घेऊ लागले आहेत. महंत नृत्य गोपालदास यांच्या मणिरामदास छावणी आश्रम स्यानीटॉईज करून आश्रमातील सर्वाना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या संपर्कात असंख्य भक्तगण आलेले आहेत त्याचबरोबर राज्याचे पर्यटन मंत्री प्रहलाद सिंह पटेल, उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री , मुख्य सचिव आर. के. तिवारी, प्रमुख सचिव गृह ए. के. अवस्थी ट्रस्टचे महासचिव चंपत राय हेसुद्धा संपर्कात आले होते.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे आशीर्वादही घेतले होते, मात्र दोघानीही मास्क वापरले होते.
महंतांच्या आरोग्यासाठी अयोध्येत अनुष्ठान सुरु !
महंत नृत्य गोपालदास कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अयोध्येत त्यांच्या स्वास्थ्यासाठी अनुष्ठान, होम, हवन सुरु झाले आहे. तीन दिवसीय अमोघ मृत संजीवनी व मृत्युंजय महामंत्र सोबतच यज्ञात आहुती दिली जात आहे.