सर्वतोपरी मदतीचे अमित शहा यांचे आश्वासन
टीम : ईगल आय मीडिया
चिपळूण, महाडनंतर आता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी सुप्रिया सुळे, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील महापुराची माहिती दिली. महाराष्ट्रात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांचीही माहिती दिली. त्यावेळी अमित शाहांकडूनही महाराष्ट्राला केंद्राकडू सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. या भेटीनंतर सुळे यांनी ट्वीट करुन अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली तसेच त्यांना महाराष्ट्रातील सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.