राष्ट्रीय स्तरावर नवा गेम ?

उद्या दिल्लीत खा.पवारांच्या उपस्थितीत 15 पक्षांच्या नेत्यांची बैठक

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी उद्या ( मंगळवारी ) दिल्लीत काँग्रेस वगळता इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस सह किंवा काँग्रेस वगळून तिसरी आघाडी उभा करण्याचा खा. पवारांचा प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. संपूर्ण देशाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४ निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी मागील 15 दिवसात मुंबईत चर्चा केल्यानंतर आज पुन्हा दिल्लीत सुमारे दीड तास चर्चा केली. यानंतर उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता विरोधी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पहिल्या बैठकीत जवळपास ४ तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर ११ जूनला पुन्हा एकदा बैठक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत रोखण्यासाठी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. 

राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीचं काँग्रेसला बोलवणं नाही. कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्र मंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्र मंचची पायाभरणी २०१८ साली यशवंत सिन्हा यांनी केली होती. सध्या तरी कोणत्याच राजकीय वाटलीची घोषणा राष्ट्र मंचाकडून करण्यात आलेली नाही. मात्र भविष्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांना तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदाची भूमिका पार पाडतील असंही सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!