5 जणांना पीडितेच्या कुटुंबास भेटण्याची योगी सरकारने दिली परवानगी
टीम : ईगल आय मीडिया
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह 5 जणांना हाथरस पीडितेच्या कुटुंबास भेटण्याची परवानगी योगी सरकारने दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर 3 नेते हाथरस कडे रवाना झाले आहेत.
हाथरसला जाताना प्रियंका गांधी स्वतः कार चालवत होत्या. तसंच त्यांच्या सोबत राहुल गांधीही आहेत. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा होता. राहुल व प्रियंका गांधी हे हथरसकडे रवाना होताच, उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर फौजफाटा वाढवला होता. तर, विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत, रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं. यमूना एक्स्प्रेस वे वर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही केला होता.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरण आता प्रचंड तापले आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते. परंतु आता प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.
या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हाथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली होती. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुःखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. परंतु आता प्रशानानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.