कंगना राणावतला आर पी आय देणार संरक्षण

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई : ईगल आय मीडिया

लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे, मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकार वर टीका केली आहे, टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

मुंबई आणि महाराष्ट्राविरुद्ध आम्ही एक शब्दही खपवून घेणार नाही मात्र सरकारवरील टीका मुंबईवरील टीका असल्याचा कांगावा करून कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही. अशी धमकी देणे लोकशाहीला धरून होणार नाही. त्यामुळे 9 तारखेला कंगना राणावत मुंबईत येईल तेंव्हा तिचे रक्षण करण्यास रिपब्लिकन पक्ष पुढे येईल, असा ईशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकार वर केलेली टीका असो याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगना राणावतला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा ईशारा आठवले यांनी आज दिला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबई ला आपल्या मातृस्थानी मानत असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे कंगना यांनी मुंबई किंवा महाराष्ट्राविरुध्द मत मांडलेले नाही सरकार आणि राज्य कारभारावर टीका करण्याचे विचारस्वातंत्र्य सर्वसामान्यांप्रमाणे कंगनालाही अधिकार आहे असे ना रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!