21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी शाळा सुरू होणार

विद्यार्थ्यांना शाळेत येणे ऐच्छिक : उघड्यावर वर्ग भरवण्याची सूचना

टीम : ईगल आय मीडिया

येत्या २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक रीतीने पुन्हा शाळांमध्ये येण्याची परवानगी देण्यात येत आहे,’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शाळा सुरू करण्यात येत असल्या तरी विद्यार्थ्यांना वर्गात येणे सक्तीचे नसेल, तसेच उघड्यावर वर्ग भरवण्यास प्राधान्य द्यावे, 50 टक्के शिक्षक उपस्थित असावेत असे विविध नियम केंद्राने जारी केले आहेत.

कोरोना महामारीमुळे मागील पाच महिन्यांपासून देशातील शाळा बंद आहेत. या शाळा २१ सप्टेंबरपासून अंशत: सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून, नववी ते बारावीच्या वर्ग घेण्यासाठी मार्गदर्शक नियामावली मंगळवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केली. शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत.

शाळेचे कामकाज सुरू करण्याआधी वर्गखोल्या, प्रयोगशाळा, इतर सामूहिक वापराची ठिकाणे एक टक्का सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाने स्वच्छ करून घ्यावे.

ऑनलाइन वर्ग, टेलिकाउन्सिलिंग आणि इतर कामांसाठी ५० टक्के शिक्षक व कर्मचाऱ्यांना बोलावता येईल.

कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीऐवजी पर्यायी स्पर्शरहित हजेरीची सोय करावी.

शाळांच्या आवारात आणि आवाराबाहेर रांगा लावण्यासाठी सहा फूट अंतर सोडून मार्किंग करण्यात यावे.
स्टाफ रूममध्येही सुरक्षित वावर पाळावा.

शक्यतो उघड्यावर वर्ग भरवावेत. समारंभ, खेळ, तसेच गर्दी होईल, असे कोणतेही उपक्रम करू नयेत.
शाळेत राज्य हेल्पलाइन क्रमांक आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे क्रमांक ठळकपणे लावणे बंधनकारक असेल.

वातानुकूलन यंत्राचा वापर होत असल्यास तापमान २४ ते ३० अंशांच्या दरम्यान असावे. तसेच, आर्द्रतेचे प्रमाण ४० ते ७० टक्के असावे.

विद्यार्थ्यांचे लॉकर सुरक्षित वावराचे नियम पाळून वापरता येतील. जिमसाठीचे नियम लागू राहतील. जलतरण तलाव बंद राहतील.

हेच नियम प्रयोगशाळा आणि कार्यशाळांची गरज असणाऱ्या संस्था उदा. व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, उच्च शिक्षणसंस्था, तंत्रशिक्षण संस्था आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था यांना लागू राहतील, असे आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

One thought on “21 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी शाळा सुरू होणार

  1. Thanks sir,karan ata gharat rahavat nahi as vatatay kadhi collage la java ani tumhi collage suru karaychi parvangi dili tumhi mantan tase low follow kartot pn plz.. college suru kra

Leave a Reply

error: Content is protected !!