कृषी विधेयकानंतर मोदी सरकारला आणखी एक धक्का
टीम : ईगल आय मीडिया
शेती क्षेत्राशी संबंधित 3 कायदे केल्यानंतर मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांत असंतोष भडकला आहे. त्यापाठोपाठ मोदी सरकारला एक धक्का बसला असून 22 वर्षे जुना सहकारी पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडायची ठरवले आहे. या पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २२ वर्षांपासून हा पक्ष एनडीए सोबत होता.
मोदी सरकारने नुकत्याच मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून विरोध होतो आहे. विरोधकांनी या प्रश्नावरुन देशभरात आवाज उठवला आहे अशातच शिरोमणी अकाली दलाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कृषि क्षेत्राशी संबधित तीन विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ही विधेयके मांडण्याच्या आधी शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर हरसिमरत कौर बादल यांनीही ट्विट करून आपण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
दीड वर्षांवर पंजाब ची विधानसभा निवडणुक सध्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पंजाबच्या राजकारणात शेती आणि शेतकरी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. शेतकऱ्यांच्या मुद्यावरूनच पंजाबमध्ये सत्तांतर घडून आलं होतं. त्यात आता पंजाब विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आधी मंत्रिमंडळातून शिरोमणी अकाली दल बाहेर पडलं आणि आता एनडीएतूनही बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
जेव्हा देशभरात भाजपला सगळे राजकीयदृष्ट्या अस्पृश्य समजत होते तेव्हा शिवसेना सर्वात अगोदर भाजप सोबत उभा राहिलेला पक्ष होता आणि त्यानंतर पंजाब मध्ये शिरोमणी अकाली दलाने भाजप सोबत आघाडी करून एन डी ए ची पायाभरणी केली. गेल्यावर्षी पहिला मित्र पक्ष असलेली शिवसेना एन डी ए तुन बाहेर पडली आहे आणि आता दुसरा जुना मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल बाहेर पडतो आहे. मोदी सरकारबरोबर शिरोमणी अकाली दल केंद्रात सत्तेत होतं.
यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यामुळे मजबूत आणि व्यापक बनलेल्या एन डी ए मधून बहुतांश मित्र पक्ष बाजूला गेले आहेत. आज भाजपसोबत जे पक्ष आहेत त्यांचे अस्तित्व प्रादेशिक पातळीवर सुद्धा अगदीच नगण्य आहे. मात्र मोठे प्रादेशिक पक्ष जे वाजपेयींच्या काळात भाजपसोबत होते त्यातील बहुतांश पक्ष बाजूला पडले आहेत. आज दुसरा मजबूत पक्ष ही बाजूला गेला आहे. यामुळे सद्यस्थितीत भाजपला राज्यसभा आणि लोकसभेत फारसा फरक पडणार नाही परंतु देशपातळीवर भाजपची प्रतिमा पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या अस्पृश्य बनते आहे.