भारतात मे महिन्यात होते 64 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण

आय सी एम आर चा दावा

टीम : ईगल आय मीडिया

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणात मे महिन्यात ६४ लाख ६८ हजार ३८८ जणांना करोनाची बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असताना हे सर्वेक्षण करण्यात आले. मेच्या सुरुवातीला एकूण लोकसंख्येच्या ०.७३ टक्के लोकांना करोनाची बाधा झाली असावी, असे या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचे एकही प्रकरण नव्हते त्या जिल्ह्यांमध्येही संसर्ग झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. या सर्वेक्षणाने ग्रामीण भागावर भर दिला होता.

देशातील २१ राज्यांच्या ७० जिल्ह्यांमध्ये ७०० गाव आणि वार्डांमध्ये ११ मे ते ४ जूनदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते. चार स्तरांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातील २५.९ टक्के म्हणजे १८१ भाग शहरी होते, करोना प्रकरणांची शून्य, किमान, मध्यम आणि सर्वाधिक अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यात १८ वर्षांवरील प्रौढांचे नमुने घेण्यात आले होते. सर्वेक्षणानंतर तीन महिन्यांनी आज त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

तीन महिन्यांपूर्वी देशातील ०.७३ टक्के म्हणजे ६४ लाख ६८ हजार ३८८ लोकांना करोनाची बाधा झाली असावी, असे या सर्वेक्षणामुळे स्पष्ट झाले आहे. करोनाची सर्वाधिक बाधा १८ ते ४५ वयोगटातील ४३.३ टक्के लोकांना झाली. त्यापाठोपाठ ४६ ते ६० वयोगटातील ३९.५ टक्के लोकांना करोनाने ग्रासल्याचे आढळून आले. या अभ्यासासाठी एकूण २८ हजार जणांची नोंदणी करण्यात आली होती.

Leave a Reply

error: Content is protected !!