मध्यप्रदेशात लस खरेदी करणाऱ्या हॉस्पिटलचा पत्ता नाही
टीम : ईगल आय मीडिया
देशभरात सर्व सामान्य माणूस कोविड लसीकरिता रांगेत तिष्ठत उभा असताना मध्यप्रदेशात चक्क 10 हजार कोविसील्ड लस गायब झाल्या आहेत. या लसी खरेदी करणारे हॉस्पिटलच गायब असल्याने हा लस घोटाळा असल्याचा आरोप विरोधी काँग्रेसने केला आहे.
मध्य प्रदेशात कोविशिल्ड लसीचे 10 हजार डोस गायब झाले आहेत. जबलपूरमधील ज्या हॉस्पिटलच्या नावे सीरम इन्स्टिट्यूटकडून हे डोस खरेदी करण्यात आले त्या नावाचे हॉस्पिटलच जबलपूरमध्ये नाही. दोन दिवसांपासून जबलपूरचा आरोग्य विभाग या हॉस्पिटलचा तपास करत आहे. पण अद्याप प्रशासनाला कुठलीही माहिती मिळालेली नाही. या घटनेने राज्याचे प्रशासन हादरले आहे.
कोविशिल्ड लसीच्या वितरणाची यादी दोन दिवसांपूर्वी जबलपूरच्या आरोग्य विभागाला मिळाली. यानंतर मॅक्स हेल्थ केअर हॉस्पिटलचा शोध घेण्यात आला. लसीकरण एपवर दोन दिवसांपूर्वी आम्हाला यासंदर्भात माहिती मिळाली. आम्ही मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून हॉस्पिटलचा शोध घेतला. पण आतापर्यंत कुठलीही माहिती हाती आलेली नाही, असं जिल्हा लसीकरण अधिकाऱ्याने सांगितलं.
मध्य प्रदेशातील फक्त ६ हॉस्पिटल्सनी सीरम इन्स्टिट्यूटकडून थेट कोविशिल्ड लसीची खरेदी केली. यात इंदूरचे तीन आणि जबलपूर, भोपाळ आणि ग्वाल्हेरच्या प्रत्येकी एका हॉस्पिटलचा समावेश आहे. या सहा हॉस्पिटल्सना कोविशिल्ड लसीचे ४३ हजार डोसचा पुरवठा सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात आला. यातील १० हजार डोस कुठे गेले? याची माहितीच नाही. दरम्यान, हा घोटाळा असल्याचा आरोप मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते भूपेंद्र गुप्ता यांनी केला आहे.
मध्य प्रदेशात रोज नवनवीन माफिया तयार होत आहते. बनावट रेमडेसिवीर, बनावट प्लाझ्मा, हॉस्पिटल्समधून इंजेक्शनची चोरी, काळ्या बुरशीवरील इंजेक्शनमध्ये गैरप्रकार करणाऱ्या माफियांनंतर आता लस घोटाळा झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटला जबलपूरमधील मॅक्स हेल्थ केअर हॉस्पिटलच्या नावाने १० हजार कोविशिल्ड लसीच्या डोसची ऑर्डर कोणी दिली? डोस गायब कसे झाले? या स्थितीला जबाबदार कोण आहे? या घटनेची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्ससाठी कोविशिल्ड लसीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारला लसीचा एक डोस १५० रुपये, राज्य सरकारला ४०० रुपये आणि खासगी हॉस्पिटल्सना ६०० रुपयांत मिळतो. यानुसार गायब झालेल्या १० हजार डोसची किंमत ही ६० लाख रुपये आहे.