धुक्यामुळे अपघात : 13 जण ठार

प.बंगालमध्ये भीषण अपघात

टीम : ईगल आय मीडिया  

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे एक मोठा अपघात घडला असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. बोल्डर भरलेल्या एका ट्रकनं समोरून येणाऱ्या 2 चारचाकी गाड्यांना धडक दिल्यानं हा अपघात घडला आहे. धुपगुडी भागात झालेल्या या अपघातात १३ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर १८ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जलपाईगुडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

रात्रीचा अंधार आणि धुकं यामुळे स्पष्ट न दिसू शकल्यानं अगोदर ट्रक आणि टाटा मॅजिक गाड्यांची धडक झाली. त्यानंतर हा ट्रक मागच्या मारुती व्हॅनलाही धडकला. सोबतच, ट्रकमध्ये भरलेले बोल्डर आजूबाजूच्या रस्त्यावर आणि गाड्यांवर फेकले गेले. त्यामुळे १३ जण जागीच ठार झाले.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.५० च्या सुमारास बोल्डरनं भरलेला एक ट्रक मायानालीकडे जात होता. दुसऱ्या बाजुनं एक टाटा मॅजिक आणि मारुती व्हॅन चुकीच्या दिशेनं पुढे सरकत होते.

सुरुवातीला जखमींना धुपगुडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना जलपाईगुडीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तसंच पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केलीय.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बोल्डरनं भरलेला एक एका दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान चुकीच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांना हा ट्रक धडकला. त्यामुळे, ट्रकमधले बोल्डर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या गाड्यांवरही फेकले गेले.

Leave a Reply

error: Content is protected !!