बाबरी पाडणे पूर्व नियोजित कट नव्हता : लखनऊ सीबीआय न्यायालयाचा निर्वाळा
टीम : ईगल आय मीडिया
लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आलं.बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं.
सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितलं की, “विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही”. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं.
न्यायालय म्हणते ‘ ते ‘ व्हीडिओ बनावट। बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टात सादर करण्यात आलेले सर्व व्हिडिओ बनावट असल्यामुळे हे व्हिडिओ पुरावे म्हणून वापरता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. सीबीआयने साक्ष अधिनियमांचे पालन केले नसल्याचे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेचाही थेट हात नसल्याचेही कोर्ट म्हणाले. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत परिस्थिती सामान्य होती मात्र त्यानंतर काही असामाजिक तत्वांनी अचानक अराजकता माजवली आणि दगडफेक केली, असेही कोर्टाने म्हटले आहे.
या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.
न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग
उमा भारती आदी प्रमुख आरोपी होते .